मुंबईची लोकल ट्रेन ही लाखो, करोडो प्रवाशांसाठी लाईफलाईन आहे. रोज लाखो नागरिक या लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. मात्र दिवसेंदिवस लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत आहे. प्रवाशांसाठी लोकलचा प्रवास हा जीवघेणा आणि जिकरिचा झाला आहे. प्रवास करताना लोकलमधून अक्षरशः दाटीवाटीने, कोंबून प्रवास करणाऱ्या प्रवासाबद्दल मुंबई हायकोर्टाने मध्य व पश्चिम रेल्वेला चांगलेच झापले आहे.
लोकलमधून गुरांप्रमाणे प्रवाशांना वाहतूक करताना पाहून आम्हालाच लाज वाटते असे हायकोर्टाने म्हटले आहे. प्रवासीसंख्येबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेऊ नका असे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने रेल्वे प्रशासनाला झापले आहे. याबाबत कोणत्याही सबबी सांगू नका. लवकरात लवकर यावर तोडगा काढावा असे निर्देश हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.
रेल्वेमधील प्रवाशांचे वाढते मृत्यू पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरू असे हायकोर्टाने म्हटले आहे. लोकलमधून दररोज प्रवास करणाऱ्या एका नागरिकाने या प्रकरणाबाबत हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. लोकलमधून प्रवास करताना दररोज ५ प्रवाशांचा मृत्यू होतो असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले.
हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. प्रवासीसंख्या वाढत असताना आम्हला मर्यादा आहेत किंवा आम्ही अमुक काही करू शकत नाही असे म्हणून तुमची जबाबदारी झटकू शकत नाही. प्रवाशांना लोकलमध्ये जनावरांसारखे कोंबले जाते, असे उच्चरायला देखील मला लाज वाटते. प्रवाशांना आम्ही गुरे असे म्हंटले म्हणून आम्ही माफी मागतो मात्र आमच्या संतप्त प्रतिक्रियेची रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी असे न्यायमूर्तींनी सांगितले.