NEET UG पेपर लीक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात CBI च्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने बिहारच्या पाटणा येथून दोघांना अटक केली आहे. यानंतर सीबीआयचे अधिकारी दोन्ही आरोपींना घेऊन पाटणा येथील विशेष सीबीआय न्यायालयात पोहोचले. जिथे न्यायालयाने त्यांची सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे. नीट युजी पेपर लीक प्रकरण सध्या देशभरात चांगलेच गाजत आहे. संसदेत देखील याचे पडसाद पाहायला मिळाले. या प्रकरणाचे कनेक्शन महाराष्ट्रात देखील असल्याचे समोर आले आहे.
सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, मनीष कुमार आणि आशुतोष कुमार यांनी कथितरित्या परीक्षेपूर्वी उमेदवारांना सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली होती, जिथे त्यांना लीक झालेले पेपर आणि आन्सर की दिल्या होत्या. NEET पेपर लीक प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत 6 एफआयआर नोंदवले आहेत. यापूर्वी सीबीआयच्या पथकाने हजारीबागमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले होते. पथकाने एसबीआय बँकेत जाऊन तपासणी केली. यावेळी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली.
देशभरातील सरकारी आणि खाजगी संस्थांमधील MBBS, BDS, आयुष आणि इतर संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NTA द्वारे NEET-UG आयोजित केले जाते. यंदाची परीक्षा 5 मे रोजी 14 परदेशी शहरांसह 571 शहरांमधील 4,750 केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेला 23 लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. या परीक्षेत गैरप्रकारांची प्रकरणे समोर आल्यानंतर एनटीएच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.