सरकारसाठी हे निरोपाचे अधिवेशन नसून राज्याचा विकासाचा निर्धार आणि पुढल्या निवडणुकीत विजयाचा निश्चय करणारे अधिवेशन आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे. विधान परिषेदेतून निवृत्त झालेल्या सदस्यांच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, विधान परिषद हे वरिष्ठ आणि मानाचे सभागृह आहे. वरिष्ठ सभागृहाला एक गरिमा आहे. यापूर्वी रोजगार हमी योजनेचे जनक वि.स. पागे, जयंतराव टिळक, रा. सू गवई, ना. स फरांदे, प्रमोद नवलकर, नितीन गडकरी, शरद पवार आणि गंगाधर फडणवीस हे नेते या सभागृहाचे सदस्य होते. स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील या सभागृहाचे सदस्य होते. या सभागृहात अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्याची संधी मिळते. बाहेर काही बोलण्यापेक्षा आत सभागृहात येऊन बोललो तर जनतेच्या प्रश्न सोडवू शकतो, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत .
निवृत्त होणाऱ्या सर्वच सदस्यांनी जनतेचे प्रश्न मांडून या सभागृहाचा लौकिक वाढवला आणि पावित्र्य जपले. समाजातील विविध क्षेत्रातील मंडळी या सभागृहात येतात आणि आपआपल्या क्षेत्रातील अडचणी मांडतात. आमदार सुरेश धस यांनी सरपंच ते राज्यमंत्री असा प्रदिर्घ काळ काम केले. सुरेश धस यांचा सर्व विषयावर अभ्यास आहे. त्यांच्या भाषणाचे अनेकजण धसका घ्यायचे. आमदार पोटे सुद्धा सर्व कामात प्रविण आहेत. एक दराडे गेले दुसरे दराडे येतील. डॉ. रामदास आंबिटकर यांनी शिक्षण क्षेत्रात चांगले काम केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, जो सदस्य सभागृहाला पूर्ण वेळ देतो. इतरांची भाषणे ऐकतो तो उत्तम संसदपटू होतो. त्यासाठी वाचन करावे लागते. काही सदस्य अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वेळ देतात. अनेक सदस्य बोलतात, प्रश्न विचारतात. इथ सर्व सभासद येतात ते जनतेला न्याय देण्यासाठी येतात. निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी लोकसेवा करण्यासाठी या सभागृहात पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. नवीन सदस्यांकडून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले जाईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे .