देशाची राजधानी दिल्लीत आज सकाळपासून सुरू असलेला पाऊस हजारो नोकरदारांसाठी संकटमय ठरला असून विविध भागात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. पहिल्या पावसानेच दिल्ली महानगरपालिका आणि दिल्ली सरकारचे सर्व दावे खोटे पडले आहेत. मात्र, दमदार पावसाने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा नक्कीच मिळाला आहे.
दिल्लीत पहिल्याच पावसात पाणी साचल्याने विशेषत: दुचाकी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. वाटेत अनेक दुचाकी पाण्यात अडकल्या. ITO येथे कंबरेपर्यंत पाण्याने भरलेले आहे. डीटीसी बसेसच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नजफगड, द्वारका, टिळक नगर आणि राजौरी गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
नवी दिल्लीतील मिंटो रोड अंडरपास येथे देखील पूर आला आहे. त्यामुळे मिंटो रोडकडे जाणारी सर्व वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ओखला, जामिया नगर, संगम विहार, खानपूर, पुल प्रल्हादपूर, सरिता विहार आदी भागात पाणी साचल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. यमुना ओलांडून पूर्व दिल्ली भागात मुसळधार पावसामुळे सीलमपूर मेट्रो स्थानकाभोवती पाणी साचले आहे. जाखिरा अंडरपास खाली बसेस थांबवल्या गेल्या आहेत. पंपातून पाणी काढले जात आहे. लाल किल्ल्याच्या आजूबाजूच्या मुख्य रस्त्यांवर पाणी साचण्याबरोबरच इतर रस्त्यांवरही पाणी साचल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
आयटीओ, आश्रम, आनंद विहार, लजपतनगर आणि चिल्ला बॉर्डरमध्ये लांबच लांब वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पूर्व दिल्लीच्या विकास मार्गावर कर्करडूमा ते आयटीओपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लक्ष्मी नगर, ललिता पार्क, गीता कॉलनी, गाझीपूर, मयूर विहार, पटपरगंज, गांधी नगर, कृष्णा नगर, लाल क्वार्टर, शाहदरा, सीलमपूर, नंदनगरी, भजनपुरा, वजिराबाद, तिमारपूरपर्यंत जाम आहे. बुराडी, नत्थुपुरा, आझादपूर, रोहतक रोड परिसरात पावसामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. करोलबाग, पहाडगंज आणि काश्मिरी गेटमध्ये मोठ्या प्रमाणात लोक वाहतूक कोंडीत अडकले आहेत.