देशाची राजधानी दिल्लीत आज सकाळपासून सुरू असलेला पाऊस हजारो नोकरदारांसाठी संकटमय ठरला असून विविध भागात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. पहिल्या पावसानेच दिल्ली महानगरपालिका आणि दिल्ली सरकारचे सर्व दावे खोटे पडले आहेत. दरम्यान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल १ च्या छताचा काही भाग देखील कोसळला आहे. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी झाले आहेत . दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यानी घटनास्थळाची पाहणी केली आहे.
दिल्ली अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेपाच वाजता छताचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळाली. मदतीसाठी तीन वाहने तातडीने पाठवण्यात आली. IGI विमानतळाच्या T-1 च्या छताचा काही भाग अचानक खाली कोसळला, असे या माहितीत म्हटले आहे. त्यामुळे तेथे उभे असलेले टॅक्सी चालक जखमी झाले. दुसरीकडे, या अपघातामुळे विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे की नाही याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.
आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसात इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 च्या छताचा काही भाग तिथे उभ्या असलेल्या वाहनांवर पडला, ज्यामुळे एकाचा मृत्यू झाला, तर ८ जण जखमी झाले. त्यानंतर नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. मंत्र्याच्या पाहणीनंतर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी पत्रकारांना सांगितले की, आता परिस्थिती नियंत्रणात आहे. टर्मिनलची उर्वरित इमारत बंद असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व गोष्टींची कसून चौकशी केली जात आहे.