आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये राज्यसरकारने समाजातील प्रत्येक घटकाला खुश ठेवायचा प्रयत्न केला आहे. युवा गट, महिला शेतकरी वारकरी यांच्याबरोबरच सर्वसामान्यांच्या अडचणींचा विचार राज्यसरकारने केलेला दिसत आहे. या अर्थसंकल्पात इंधन दरात घट करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
मुंबई, ठाणे , नवी मुंबईतील पेट्रोल आणि डिझेलवरील विक्री करात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.राज्यातील पेट्रोल, डिझेलवरील करात समानता आणण्याची घोषणा या वेळच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.मुंबई, ठाणे, नवी मुंबई
महापालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यावरून २१ टक्के केला जाणार आहे. . तर, पेट्रोलवरील कर २६ टक्क्यावरून २५ टक्क्यांवर आणला जाणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे व नवी मुंबईत पेट्रोलच्या दरात 65 पैसे कमी होतील. तर डिझेलच्या दरात 2 रुपयांची कपात होणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग केंद्रांना दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल-डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
तसेच शिवडी-न्हावाशेवा प्रकल्पांतर्गत शिवडी-वरळी जोडरस्त्याचे ५७ टक्के काम झाले असून डिसेंबर २०२५ अखेपर्यंत काम पूर्ण होईल. बाळकुंभ येथील गायमुखजवळील ठाणे किनारी मार्गाची लांबी १३.४५ किमी असून ३३६४ कोटींचं हे काम मे २०२८ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. मुंबई किनारी मार्गाचं बहुतांश काम पूर्ण झाले असून दोन्ही मार्गिका अंशत: खुल्या करण्यात आल्या आहेत अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.