आषाढी वारी पालखी सोहळ्याला सुरवात झाली असून श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज पुण्यात आगमन होणार असून मुक्काम असणार आहे. या सोहळ्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते रविवारी दुपारनंतर आवश्यकतेनुसार वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच दोन्ही पालख्यांच्या आगमनासाठी भवानी आणि नाना पेठेतील मंदिर परिसर सज्ज झाले आहेत. ठिकठिकाणी विद्युत रोषणाई, सजावट, रंगरंगोटी, सीसीटीव्ही कॅमेरे, आरोग्य शिबिरे,मोबाईल टॉयलेट आदी सोयी सुविधांचे आयोजन करण्यात आले आहे.
या दोन्ही पालख्यांसोबत मोठ्या प्रमाणात वारकरी देखील पुण्यात दाखल होणार आहेत . या सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पुणे पोलिसांनी तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. या सोहळ्यावर सीसीटीव्हीमधून नजर ठेवली जाणार असून यासाठी वॉच टॉवर देखील शहरात उभे केले जाणार आहे.
आज या दोन्ही पालख्या पुण्यात दाखल झाल्यानंतर सोमवारी पालख्यांचा मुक्काम नाना- भवानी पेठेत राहणार आहे. तर मंगळवारी (2 जुलै) त्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत . श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात असेल. . श्री संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात राहणार आहे. या सोहळ्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे.
या पालखी सोहळ्यासाठी दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त, १० पोलीस उपायुक्त, २० सहायक पोलीस आयुक्त, १०१ पोलीस निरीक्षक ३४३ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, तर ३६९३ पोलीस कर्मचारी, ८०० गृहरक्ष दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
यानंतर हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी थांबणार आहेत. या दिवशी दिवेघाट पूर्ण दिवस बंद असणार आहे. महात्मा गांधी स्थानक इथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्यात आली आहे. हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पुर्णतः बंद राहणार आहे.