जनरल मनोज पांडे यांनी आज सेवानिवृत्त होत भारतीय लष्कराची कमान जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडे सोपवली. जनरल द्विवेदी हे 30वे लष्करप्रमुख आहेत. लष्करप्रमुख झाल्यावर द्विवेदी यांना लेफ्टनंट जनरलवरून जनरल पदावर बढती देण्यात आली आहे.
यापूर्वी त्यांनी लष्कराचे उपप्रमुख, नॉर्दर्न आर्मी कमांडर, डीजी इन्फंट्री आणि लष्करातील इतर अनेक कमांडचे प्रमुख म्हणून काम केले आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर व्यापक ऑपरेशनल अनुभव असलेले जनरल द्विवेदी यांनी यापूर्वी लष्कराचे उपप्रमुख म्हणून काम केले आहे.
लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी 2022-2024 पर्यंत महासंचालक इन्फंट्री आणि जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ (HQ नॉर्दर्न कमांड) यासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत .तसेच चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारताला विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागत असताना जनरल द्विवेदी यांनी 13 लाख जवानांच्या सैन्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना परम विशिष्ट सेवा पदक (PVSM), अति विशिष्ट सेवा पदक (AVSM) आणि तीन जीओसी-इन-सी प्रशंसा प्रदान करण्यात आले आहेत.
जनरल द्विवेदी यांची जनरल मनोज पांडे यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. जनरल मनोज पांडे हे आजच निवृत्त झाले आहेत. शेवटच्या कामकाजाच्या दिवशी त्यांना लष्कराकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. ते 26 महिने लष्करप्रमुख राहिले.