विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी संसदेत केलेल्या ‘हिंदू’बद्दलच्या वादग्रस्त विधानाचा सर्व स्तरांमधून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. उज्जैनमध्ये दिगंबर आखाड्याच्या संतांनी मंगलनाथ मंदिर रोडवर एकत्र येत राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात निदर्शने केली. तसेच राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि विधान मागे घ्यावे,अशी मागणी त्यांनी केली आहे.तसे न केल्यास प्रखर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
खरे तर राहुल गांधी यांनी संसदेत सांगितले की, मोदीजींनी एके दिवशी आपल्या भाषणात सांगितले की, भारताने कधीही कोणावरही हल्ला केला नाही. त्याला कारण आहे. हा देश अहिंसेचा देश आहे, हा देश भीतीचा देश नाही. आपल्या सर्व महापुरुषांनी अहिंसेबद्दल सांगितले. भीती निर्मूलनाबद्दल बोलले मात्र जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा, हिंसा,, द्वेष, द्वेष असत्य, असत्य, हेच करतात, नरेंद्र मोदीजी संपूर्ण हिंदू समाज नाहीत. भाजप हा संपूर्ण हिंदू समाज नाही. आरएसएस हा संपूर्ण हिंदू समाज नाही. स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारे 24 तास हिंसा करतात..तुम्ही मुळीच हिंदू नाही.
या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राहुल यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण हिंदू समाज खजील झाला आहे.हिंदूंना हिंसक म्हणणे हे राहुल गांधींच्या क्षुद्र मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. देशातील विरोधी पक्षनेते हिंदूंना लाजवत असतील, तर ते कसे खपवून घेणार? यासाठी राहुल गांधींनी नाक घासून माफी मागावी. तसेच या वक्तव्यावर काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी.
त्याचवेळी मंत्री विश्वास सारंग यांनी राहुल गांधींचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले आहेत की, राहुल गांधी यांचे वक्तव्य केवळ आक्षेपार्ह नाही तर लज्जास्पद आहे. निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी हिंदू मत मिळवण्यासाठी पवित्र धागा घालून स्वतःला हिंदू असल्याचे दाखवतात आणि लोकसभेत पोहोचल्यावर मात्र हिंदू धर्म आणि हिंदू देव-देवतांचा अपमान करतात. ही इटालियन मानसिकता भारतात चालणार नाही.
उज्जैनमध्ये दिगंबर आखाड्याचे महंत शिवदास त्यागी म्हणाले आहेत की, राहुल गांधी सतत हिंदूंना दुखवण्याचे काम करत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर सर्वांनी बहिष्कार टाकावा. 20 लाख नागा साधू रस्त्यावर आले तर काँग्रेसला चालायला जागा राहणार नाही. यावर काँग्रेसने माफी मागावी. अन्यथा संत समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. याची खात्री बाळगावी आखाड्याचे संत मुनीशरण दास त्यागी म्हणाले की, राहुलने असे वक्तव्य करून गुन्हा केला आहे. त्याचा निषेध करा. सर्वसामान्यांनीही याला विरोध केला पाहिजे.