सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar ) यांना मानहानी प्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरवत पाच महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. तसेच १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंडाची रक्कम व्हीके सक्सेना यांना देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
मेघा पाटकर यांना 23 वर्षीय जुन्या खटल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
मेधा पाटकर आणि दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्यातील संघर्ष हा गेल्या २३ वर्षांपासून सुरु आहे. २००२ साली सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर नर्मदा बचाव आंदोलनात सक्रिय होत्या. तर त्यावेळी व्ही के सक्सेना नॅशनल कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीजच्या माध्यमातून सक्रिय होते. त्यावेळी त्यांनी मेधा पाटकर यांच्या आंदोलनाला कडाडून विरोध केला होता.
यानंतर मेधा पाटकर यांनी व्ही के सक्सेना यांच्याविरोधात आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या विरोधात जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल मानहानीचा खटला दाखल केला होता. तर दुसरीकडे व्ही के सक्सेना यांनी आपल्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल मेधा पाटकर यांच्यावर मानहानीचे दोन खटले दाखल केले होते. या मानहानी प्रकरणाचा निकाल मेधा पाटकर यांच्या विरोधात लागला असून या प्रकरणी महानगर दंडाधिकारी राघव शर्मा यांनी मेधा पाटकर यांना मानहानीच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. पाटकर यांचे वय व प्रकृती लक्षात घेऊन एक किंवा दाेन वर्षांची कमाल शिक्षा दिलेली नाही, असे कोर्टाने यावेळी सांगितले आहे.