जुलै महिन्यात १२ तारखेला महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. अकरा जागांपैकी विधान परिषदेच्या पाच जागा भाजप लढविणार आहे. त्यासाठी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. विधान परिषदेसाठी 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. तसेच त्याच दिवशी निकालही जाहीर होतील. दरम्यान भाजपतर्फे आज पंकजा मुंडे यांनी विधान परिषद निवडणूकीचा अर्ज भरला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
अर्ज भरण्यापूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, ”आजच्या दिवसाची मी सकारात्मक सुरूवात करत आहे. चांगल्या-वाईट काळामध्ये मला संधी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. मला वाट पाहावी लागली, मात्र आज लोकांना हवे आहे ते झाले आहे. आज मला जे काही मिळत आहे ते मी पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. त्यांना समर्पित करते.”
पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन होणे पक्षाच्या दृष्टीने महत्वाचे होते. जनतेची व सर्व कार्यकर्त्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे. मागील ५ वर्षे त्यांना संधी मिळाली नाही याचे सर्वाना दुःख झाले होते. आता मात्र पक्षाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. येणाऱ्या निवडणुकीत अधिक ताकदीने आम्ही सामोरे जाऊ, असे आमदार सुरेश धस म्हणाले आहेत. पंकजा मुंडे यांना संधी देऊन आम्हाला बुस्टर डोस दिला असे असे धस म्हणाले.
भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये त्यामध्ये लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागा 27 जुलै रोजी रिक्त होत आहे या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जाणार आहेत. सध्याचे संख्याबळ पाहिल्यास भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी होऊ शकतात.