केनियामध्ये नवीन कर कायद्याच्या विरोधात देशव्यापी निदर्शना दरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किमान 39 लोक ठार झाले आहेत. स्थानिक वृत्तपत्र पीपल डेलीच्या वृत्तानुसार, सरकार आणि सुरक्षा यंत्रणांच्या इशाऱ्यांचा नागरिकांवर कोणताही परिणाम होत नाही. सरकारच्या विरोधात नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा विचार करत आहेत.
केनिया राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या म्हणण्यानुसार, केनियामध्ये कर कायद्याच्या विरोधात देशव्यापी निदर्शनांमध्ये 39 लोक ठार आणि 361 जखमी झाले आहेत. याशिवाय ३२ जण बेपत्ता आहेत. या कालावधीत 627 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, बिघडत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता करत केनियाच्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारला संवेदनशील भागात सुरक्षा दल तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
केनियामध्ये मे महिन्यात वित्त विधेयक 2024 सादर करण्यात आले. दैनंदिन वापराच्या वस्तूंवर भारी कर लावण्याचा हा प्रस्ताव आहे. या विधेयकावर संसदेत मतदान झाले. सुमारे 195 खासदारांपैकी 106 खासदारांनी त्याच्या बाजूने मतदान केले. हे समजताच रस्त्यावर निदर्शने सुरू झाली. संतप्त जमावाने संसदेला आग लावली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. हिंसाचार आणि अराजकतेविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असे केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो यांनी म्हटले आहे. केनियामध्ये सुरू असलेल्या अशांततेमुळे भारत चिंतेत आहे. केनियामध्ये 80 हजार ते एक लाख भारतीय राहतात.
केनियातील हिंसक निदर्शनादरम्यान, आफ्रिकन देशातील सध्याची तणावपूर्ण परिस्थिती पाहता भारताने आपल्या नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. त्याबद्दलच्या सूचना भारताने आपल्या नागरिकांसाठी जारी केल्या आहेत. केनियातील भारतीय उच्चायुक्तांनी मंगळवारी ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, सध्याची तणावपूर्ण परिस्थिती पाहता, केनियातील सर्व भारतीयांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अनावश्यक हालचालींवर मर्यादा घालाव्यात आणि परिस्थिती निवळेपर्यंत निदर्शने आणि हिंसाचाराने प्रभावित क्षेत्रात जाणे टाळावे.