उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या काल चेंगराचेंगरीच्या घटनेत 121 लोकांचा मृत्यू झाला होता.तर अनेकजण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी याठिकाणी पोचले आहेत.यावेळी त्यांनी पोलीसांची भेट घेत सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
याआधी आज राज्यमंत्री आणि भाजप आमदार असीम अरुण म्हणाले, “पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत 121 जणांचा मृत्यू झाला आहे. 19 मृतदेहांची ओळख पटणे बाकी आहे. काल जेव्हा कार्यक्रम संपला, आयोजकांचे गैरव्यवस्थापन दिसून आले आहे. लोकांसाठी बाहेर पडण्याचा मार्ग अरुंद होता, खड्डा होता याची खातरजमा करणे आवश्यक असल्याचेही बोलले जात आहे, लोक एकमेकांवर पडले आणि गुदमरून मृत्यूमुखी पडले.”
त्यांनी पुढे सांगितले की मुख्यमंत्र्यांनी आग्रा झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी) यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
देवप्रकाश मधुकर, ज्यांना ‘मुख्य सेवेदार’ म्हणून संबोधले जाते त्यांच्यासह ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली त्या सत्संगाच्या इतर आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
आज तत्पूर्वी, राज्य पोलिसांचे फॉरेन्सिक पथक श्वान पथकासह घटनास्थळी पोहोचले जेथे भाविकांचे सामान सापडले. न्यायवैद्यक पथकाच्या एका सदस्याने सांगितले की, घटनास्थळी भाविकांचे पादत्राणे आणि चादर यांसारखे सामान सापडले आहे.उत्तर प्रदेश पोलिसांनी मैनपुरी जिल्ह्यातील राम कुटीर चॅरिटेबल ट्रस्ट येथेही शोध मोहीम सुरू केली आहे,
“आम्हाला बाबा जी कॅम्पसमध्ये सापडले नाहीत. ते येथे नाहीत,” असे डेप्युटी एसपी सुनील कुमार यांनी सांगितले आहे. ज्यांना भोले बाबा म्हणून ओळखले जाते, ते हाथरस येथील ‘सत्संग’ चे उपदेशक नारायण साकर हरी यांच्या शोधासाठी पोलीस पाठवण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी हातरस येथील धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. सिकंदरा राव पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री दाखल झालेल्या गुन्ह्यात ‘मुख्य सेवेदार’ देवप्रकाश मधुकर आणि इतर आयोजकांची नावे आहेत.
हाथरस चेंगराचेंगरीच्या घटनेतील प्रत्यक्षदर्शी शकुंतला देवी म्हणाल्या, “तिथे भोले बाबाचा सत्संग सुरू होता. सत्संग संपल्यानंतर लगेचच अनेक लोक तिथून बाहेर पडू लागले. रस्ता नादुरुस्त असल्याने चेंगराचेंगरी झाली आणि लोक अंगावर पडले”.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून ह्या घटनेमागील सत्य उघड करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची पुष्टी मुख्यमंत्री योगी यांनी केली आहे.
“अशा घटनेवर शोक व्यक्त करण्याऐवजी राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. सरकार या प्रकरणी संवेदनशील असून, हा अपघात आहे की षडयंत्र आहे, या प्रकरणाच्या तळागाळापर्यंत पोहोचून या घटनेला जबाबदार व्यक्तींना शासन केले जाईल” असे ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सखोल तपास सुनिश्चित करण्यासाठी, अतिरिक्त डीजी आग्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक टीम तयार करण्यात आली आहे, ज्यांना तपशीलवार अहवाल देण्याचे काम देण्यात आले आहे.