हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. बुधवारी येथे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, या घटनेत 121 भाविकांचा मृत्यू झाला आहे. हाथरस दुर्घटनेत पोलिसांनी चौकशीनंतर आयोजन समितीशी संबंधित ६ जणांना अटक केली आहे. हातरस चेंगराचेंगरीच्या घटनेवर अलीगडचे आयजी शलभ माथूर यांनी ही माहिती दिली. मुख्य आरोपी प्रकाश मधुकर याच्या अटकेवर एक लाख रुपयांचे बक्षीसही त्यांनी जाहीर केले.
आयजी शलभ माथूर म्हणाले, “जेव्हा चेंगराचेंगरी झाली तेव्हा सहा सैनिक, ज्यांना आता अटक करण्यात आली आहे, ते घटनास्थळावरून पळून गेले होते. मुख्य आरोपी प्रकाश मधुकर याच्या अटकेवर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. लवकरच त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाईल, ही घटना काही कटाचा भाग म्हणून घडली आहे का याचाही तपास करू.”
अटक करण्यात आलेल्यांमध्ये ४ पुरुष आणि २ महिलांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. ते सर्व आयोजन समितीचे सदस्य असून ‘सेवादार’ म्हणून काम करतात. ते म्हणाले की मृतांची संख्या 121 आहे. सर्व मृतदेहांची ओळख पटली असून शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रतिभानपूर इथे आयोजित स्वयंभू संत भोले बाबा यांच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढवण्याची भिती व्यक्त केली जात आहे.गेल्या कित्येक वर्षातील ही अतिशय भयानक दुर्दैवी घटना असल्याचे सांगितले जात आहे. या सत्संगाचे आयोजन ‘भोले बाबा’ उर्फ बाबा नारायण हरी उर्फ साकार विश्व हरी यांच्या संस्थेने केले होते. मृत आणि जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या भीषण दुर्घटनेनंतर सत्संग जिथे झाला आणि चेंगराचेंगरी झाली तिथे मृतदेहांचा अक्षरश: खच पडला होता. घटनास्थळावरचे दृश्य पाहून डोळ्यातील अश्रूही थिजतील अशी भयानक परिस्थिती होती.
सत्संग आटोपल्यानंतर भोले बाबा गाडीत बसून निघाले असता, त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी व त्यांच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी अनुयायांचा जमाव त्यांच्या मागे धावला. बाबांचा पाय जिथे पडेल तेथील माती उचलत अनुयायी पुढे पुढे जात राहिले.रस्त्याच्या पलीकडे पाच ते सहा फूटावरच मोठा खड्डा होता. मागून लोकांचा जमाव अंगावर आल्याने समोरचे लोक दबावामुळे खड्ड्याच्या दिशेने पडू लागले.आणखी लोक येतच राहिले आणि एकमेकांच्या अंगावर पडणाऱ्यांची संख्या वाढू लागली.