गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये (Bihar) सतत पूल कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. पावसाळा सुरू होताच बिहारमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या शहरात पूल कोसळत आहेत. आता बिहारमधील सारण जिल्ह्यात काल सकाळी आणखी एक पूल कोसळला आहे. गेल्या पंधरवड्यात राज्यात पूल कोसळण्याची ही दहावी घटना आहे. तर गेल्या २४ तासांत सारणमधील पूल कोसळण्याची ही तिसरी घटना आहे.
तर त्या आधी बिहारच्या सिवान जिल्ह्यातून गंडकी नदीवरील (Gandaki River) पूल कोसळल्याची माहिती समोर आली होती. अहवालानुसार, महाराजगंज उपविभागातील देवरिया पंचायतीच्या पडेन टोलाजवळ गंडकी नदीवर बांधलेला पूल अचानक खचला व कोसळला. त्यानंतर या पुलावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हा पूल कोसळल्यामुळे जवळपास डझनभर गावांतील वाहतुकीला समस्या निर्माण झाली आहे.
आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.मात्र अलीकडेच मधुबनी, अररिया, पूर्व चंपारण आणि किशनगंज यांसारख्या जिल्ह्यांमध्ये अशाच घटनांची नोंद झाली आहे, ज्याने बिहार सरकारला या घटनांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यास प्रवृत्त केले आहे.
रांची मधील एक पूल असाच मुसळधार पावसामुळे कोसळला होता. सुमारे १० कोटी खर्चून हा बांधण्यात आला होता. मात्र पुलाच्या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर केल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले होते.
सिवान, सारण, मधुबनी, अररिया, पूर्व चंपारण आणि किशनगंज जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत एकूण दहा पूल कोसळले आहेत. स्थानिकांनी सांगितले की, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पूल कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान बिहार सरकारला पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे . तसेच अधिवक्ता ब्रजेश सिंग यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकामध्ये राज्यातील पुलांची सुरक्षा आणि मजबुतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याबरोबरच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मापदंडानुसार पुलांवर देखरेख ठेवण्याची विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.