पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताबद्दल रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अल्पवयीन आरोपीने भरधाव वेगाने गाडी चालवत दोन जणांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला झालेली अटक, कोर्टाने सुनावलेली शिक्षा यावरून सोशल मीडियावर बरीच टीका टिपण्णी करण्यात आली होती. ३०० शब्दांचा निबंध लिहावा, नियोजन करावे अशा शिक्षा कोर्टाने त्याला दिल्या होत्या. अखेर बालसुधारगृहातून बाहेर आल्यानंतर त्या अल्पवयीन आरोपीने ३०० शब्दांचा निबंध लिहिला आहे. अल्पवयीन आरोपीने ३०० शब्दांचा निबंध अखेर आपल्या वकिलांमार्फत बालहक्क न्यायालयापुढे सादर केला आहे.
पोर्शे कार अपघाताप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आई-वडील अजूनही तुरुंगातच आहेत. ससून हॉस्पिटलमध्ये आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल किंवा त्याच्याशी छेडछाड केल्याप्रकरणी आरोपीच्या आईला अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी अजूनही सुरुच आहे. दरम्यान आरोपीच्या आत्याने पुणे पोलीस व बालहक्क मंडळाच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टाने त्यांना पुन्हा केलेली अटक चुकीची होती असे म्हणत आरोपीला तात्काळ तुरुंगातून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ता आरोपीचा ताबा त्याच्या आत्येकडे देण्यात आला आहे.
पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले होते. न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. अल्पवयीन आरोपीचे आई-वडील सध्या तुरुंगात असल्याने आरोपीचा ताबा हा त्याच्या आत्येकडे दिला गेला आहे. दरम्यान यामुळे आता पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुण्यात झालेल्या अपघाताने सध्या सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने पोर्श कारने एका तरूणी आणि तरूणीला धडक दिली होती, ज्यामध्ये त्या दोघांचा मृत्यू झाला आहे.