नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने NEET PG या परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. आता नीट पीजी परीक्षा 11 ऑगस्ट 2024 ला दोन शिफ्टमध्ये आयोजित केली जाणार आहे. विद्यार्थी नीट पीजी परीक्षेचे नवे वेळापत्रक एनबीईची वेबसाईट natboard.edu.in वर पाहू शकतात. ही परीक्षा नीट यूजी परीक्षेतील गैरप्रकार, नेट परीक्षेतील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर टाकण्यात आली होती.
याबाबतची अधिसूचना एनबीईएमएसकडून जारी करण्यात आली आहे. यासंदर्भातील एक परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. देशभरात पदवी स्तरावरील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नीट यूजी परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर नेट म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षेत देखील गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर 23 जूनला होणारी नीट पीजी परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती.
नीट यूजी आणि राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सी करते मात्र या दोन्ही परीक्षेत मोठा गैरप्रकार झाल्यानंतर नीट पीजी परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकली गेली होती.त्यानंतर नीट परीक्षेची नवीन तारीख ही जाहीर करण्यात आली आहे.
नीट-पीजी २०२४ परीक्षेमधील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अक्षरशः टांगणीला लागले होते. परीक्षेतील गोंधळामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या देशव्यापी परीक्षेतील गोंधळानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते.या दरम्यान या परीक्षेत झालेल्या हेराफेरी आणि पेपर लीक प्रकरणी कारवाई करत केंद्र सरकारने मोठी कारवाई करत NTA DG सुबोध कुमार यांना पदावरून हटवले होते. तसेच 23 जून रोजी होणारी NEET-PG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता या परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थाना मोठा दिलासा मिळाला आहे.