महायुती सरकारने यंदाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. दरम्यान यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १,५०० रूपये मिळणार आहेत. या योजनेची घोषणा होताच राज्यातील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. आता या योजनेबाबत अर्थमंत्री अजित पवारांनी मोठे भाष्य केले.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणालाही पैसे देऊ नका असे आवाहन केले आहे. कोणी तुमच्याकडे पैसे मागत असेल तर संबंधित ठिकाणी तक्रार करावी. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे ऑगस्टमध्ये बँकेत जमा झाले तरी तुम्हाला १ जुलैपासूनची रक्कम मिळणार आहे. योजनेचे फॉर्म भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. त्यासाठी योजनेची मुदत देखील वाढवून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरायला मोठी गर्दी झाल्याने काही महिलांना फॉर्म देखील भरता आलेले नाहीत. मात्र आता हा फॉर्म महिलांना घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने देखील भरता येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पीडीएफ डाउनलोड करून तुम्हाला त्यामध्ये तुमचे नाव तपशील सगळे भरावे लागणार आहेत. त्यानंतर हा भरलेला फॉर्म तुम्हाला वेबसाईटवर अपलोड करावा लागेल. अपलोड करताना आवश्यक कागदपत्रे देखील जोडावी लागणार आहेत. त्यात विचारण्यात आलेले सर्व तपशील तसेच ज्या खात्यात पैसे यायला हवेत त्याचे डिटेल्स देखील तुम्हाला द्यावे लागणार आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोण असणार पात्र?
मध्यप्रदेश सरकारच्या लाडली बहना योजनेच्या धरतीवर महाराष्ट्रात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली आहे. मध्यप्रदेश मध्ये ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली होती. योजना किती मोठी आणि लोकप्रिय ठरली होती हे आपल्याला मध्य प्रदेशच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून लक्षात आलेच असेल. महाराष्ट्रात सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीत ही योजना गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी पात्र महिला कोण असू शकतात किंवा त्यासाठीचे निकष कोणते आहे ते जाणून घेऊयात.
१. वय 21 ते 60 वर्षे
२. दरमहा दीड हजार रुपये मिळणार
३. दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करणार
योजनेसाठी पात्र असण्यासाठी येथील महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेत विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्या आणि निराधार महिला देखील आपली नोंदणी करू शकतात. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. साठ वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.