लोकसभा निवडणूक निकालाचे आत्मचिंतन करणाऱ्या भाजपने काल अनेक राज्यांमध्ये नवे प्रभारी व सहप्रभारींची नेमणूक केली. पक्षातर्फे संध्याकाळी या नेत्यांच्या नावांच यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. तसेच आगामी काही राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने आपल्या नेत्यांची चिंतन बैठक घेतली. या सर्वबाजूंनी सांगोपांग विचार करण्यात आला. त्यानंतर भाजपने देशातील विविध राज्यांमध्ये नवे प्रभारी आणि सहप्रभारी नेमण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिली आहे. . भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्तीचे पत्र जारी केले आहे. भाजपने जाहीर केलेल्या या यादीत 23 राज्ये आणि इशान्येकडील प्रदेश प्रभारी तथा सह प्रभारी नियुक्तीची माहिती दिली आहे. यानुसार, आमदार अशोक सिंघल यांना अरुणाचल प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. श्रीकांत शर्मा यांना हिमाचल प्रदेशचे प्रभारी म्हमून नियुक्त करण्यात आले आहे. तर संजय टंडन सह प्रभारी असतील. जम्मू-काश्मीरच्या प्रभारीपदाची धुरा तरुण चुघ यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. कर्नाटकचे प्रभारी म्हणून राधा मोहन दास अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनोद तावडे यांना बिहारचे प्रभारी बनवण्यात आले आहे.
याच वर्षी महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपच्या या यादीत महाराष्ट्राच्या प्रभारी अथवा सहप्रभारींचे नाव नाही. झारखंडमध्ये आधीच तैनात असलेले लक्ष्मीकांत वाजपेयी हेच पुढेही काम बघतील. तर, राजधानी दिल्लीला लागून असलेल्या हरियाणामध्ये राजस्थानचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांना प्रभारी म्हणून आणि सुरेंद्र सिंह नागर यांना सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. काही राज्यांमध्ये केवळ प्रभारी तर काही राज्यांमध्ये सहप्रभारीही नियुक्त करण्यात आले आहेत.