ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पार्टीच्या दणदणीत विजयानंतर शुक्रवारी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर कीर स्टार्मर (Keir Starmer) यांनी राष्ट्राची पुनर्बांधणी करण्याचे वचन दिले. तर त्यापूर्वी भारतीय वंशाचे पहिले ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक(Rishi Sunak ) यांनी निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या दारुण पराभवानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
निवडणुकीतील प्रचंड विजयानंतर, 61 वर्षीय कीर स्टार्मर यांनी बकिंगहॅम पॅलेस येथे राजा चार्ल्स तिसरा यांच्याशी औपचारिक भेट घेतल्यानंतर 58 वे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला. 650 सदस्यांच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये लेबर पक्षाला 412 जागा मिळाल्या. 2019 मधील गेल्या निवडणुकीत मिळालेल्या जागांपेक्षा ही संख्या 211 अधिक आहे. तर सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाने 121 जागा जिंकल्या, ज्या गेल्या निवडणुकीपेक्षा 250 जागा कमी आहेत. मजूर पक्षाची मतांची टक्केवारी 33.7 होती, तर कंझर्व्हेटिव्ह पक्षाची मतांची टक्केवारी 23.7 होती.
“आमच्या देशाने बदल, राष्ट्रीय नूतनीकरण आणि सार्वजनिक सेवेकडे राजकारणात परत येण्यासाठी निर्णायकपणे मतदान केले आहे,” स्टार्मर यांनी ब्रिटीश पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान 10 डाउनिंग स्ट्रीटच्या बाहेर येत प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “जेव्हा जनतेने टाकलेला विश्वास आणि राजकीय नेत्यांकडून मिळालेली सेवा यातील दरी रुंदावते तेव्हा देशाच्या हृदयात निराशा निर्माण होते, आशा, भावना, चांगल्या भविष्यातील विश्वास नष्ट होतो. आपल्याला एकत्र पुढे जाण्याची गरज आहे. ”
ऑक्टोबर 2022 मध्ये ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणारे सुनक म्हणाले की, सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या पराभवाची ‘जबाबदारी’ घेऊन मी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतेपद सोडत आहे.ते म्हणाले की,“फक्त तुमचा निर्णय महत्त्वाचा आहे. तुमचा राग, तुमची निराशा मी पाहिली आहे आणि या पराभवाची जबाबदारी मी घेतो… या निकालानंतर मी पक्षाचे नेतेपद सोडेन”.
सुनक यांचे अनेक चर्चेत आलेले मंत्री आणि खासदार आणि त्यांचे पूर्ववर्ती पंतप्रधान लिझ ट्रस यांची ‘मिनी बजेट’ सारखी घातक आर्थिक धोरणे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या पराभवासाठी जबाबदार धरली जात आहेत.
त्याच वेळी, लेबर पार्टीमध्ये, प्रीत कौर गिल आणि टॅन ढेसी यांच्यासह अनेक भारतीय वंशाचे खासदार पुन्हा निवडून आले आणि जस अठवाल आणि कनिष्क नारायण यांसारखे भारतीय वंशाचे नवीन चेहरे देखील संसदेत निवडून आले आहेत.