भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी शनिवारी रांची एमपी-एमएलए न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यावर, तक्रारदाराच्या वकिलाने राहुल गांधींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याची विनंती केली मात्र न्यायालयाने नकार दिला. विशेष न्यायाधीश सार्थक शर्मा यांच्या कोर्टाने सांगितले की, समन्स बजावण्यात आला आहे की नाही याचा सर्व्हिस रिपोर्ट कोर्टाला मिळालेला नाही. हे पाहता अद्याप वॉरंट जारी करता येणार नाही. या खटल्यात हजर होण्याची पुढील तारीख निश्चित करण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान तक्रारदार नवीन झा यांचे वकील विनोद कुमार साहू हजर झाले.
यापूर्वी न्यायालयाने राहुल गांधी यांना समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. राहुल गांधींच्या वतीने न्यायालयाने यापूर्वी जारी केलेल्या समन्सला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते, ते उच्च न्यायालयाने फेटाळले होते. यानंतर खासदार-आमदार न्यायालयाने राहुल गांधींना पुन्हा समन्स बजावले आहे. 2018 साली या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर रांची सिव्हिल कोर्टाने राहुल गांधींना पहिल्यांदाच समन्स बजावले होते. भाजप कार्यकर्ते नवीन झा यांनी 2018 साली ही तक्रार केली होती. याचिकेत म्हटले आहे की, काँग्रेसचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत झालेल्या अधिवेशनात भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.
नवीन झा यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी राहुल म्हणाले होते की, भाजपमध्ये खुनी व्यक्ती अध्यक्ष होऊ शकतो पण काँग्रेसमध्ये असे होऊ शकत नाही. या वक्तव्याने ते दुखावले आहेत. पक्षाची प्रतिमा डागाळली आहे. या कारणास्तव तक्रार दाखल करण्यात आली.जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते विजय मिश्रा यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी 15 जुलै 2018 रोजी कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायालयाने 27 नोव्हेंबर 2023 रोजी राहुल गांधींना सुनावणीसाठी बोलावले होते. तसेच 20 फेब्रुवारी रोजी राहुल गांधी कोर्टात हजर झाले आणि त्यांना जामीन मिळाला. तेव्हापासून त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी खटला प्रलंबित आहे. गेल्या 7 जून रोजी कोतवाली नगर येथील घरहा कला डिहवा येथील राम प्रताप यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून पक्षकार बनवण्याची मागणी केली होती.
तक्रारदार भाजप नेते विजय मिश्रा यांचे वकील संतोष पांडे यांनी विरोध केला होता. राहुल गांधींच्या अवाजवी प्रभावाखाली खटला लांबवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत बुधवारी सुनावणी होऊन न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला.