पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच आता वरळीमध्ये देखील हिट अँड रन अपघात घडला आहे. एका बीएमडब्ल्यू गाडीने गेलेल्या एका कुटुंबाला उडवले आहे. या अपघातामध्ये नवरा थोडक्यात वाचला आहे. तर बायकोचा म्हणजेच महिलेचा गाडीखाली आल्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
वरळीत हा अपघात घडला आहे. बीएमडब्ल्यूच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. ज्या कुटुंबाला गाडीने धडक दिली ते कुटुंब दुचाकीवरून जात होते. तेव्हा भरधाव वेगाने गाडीने दुचाकीला धडक दिली. त्यात नवऱ्याचे प्राण थोडक्यात वाचले असून तर महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून दुचाकी ताब्यात घेतली आहे.
काय आहे पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण?
पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताबद्दल रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अल्पवयीन आरोपीने भरधाव वेगाने गाडी चालवत दोन जणांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला झालेली अटक, कोर्टाने सुनावलेली शिक्षा यावरून सोशल मीडियावर बरीच टीका टिपण्णी करण्यात आली होती. ३०० शब्दांचा निबंध लिहावा, नियोजन करावे अशा शिक्षा कोर्टाने त्याला दिल्या होत्या. अखेर बालसुधारगृहातून बाहेर आल्यानंतर त्या अल्पवयीन आरोपीने ३०० शब्दांचा निबंध लिहिला आहे. अल्पवयीन आरोपीने ३०० शब्दांचा निबंध अखेर आपल्या वकिलांमार्फत बालहक्क न्यायालयापुढे सादर केला आहे.
पोर्शे कार अपघाताप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आई-वडील अजूनही तुरुंगातच आहेत. ससून हॉस्पिटलमध्ये आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल किंवा त्याच्याशी छेडछाड केल्याप्रकरणी आरोपीच्या आईला अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी अजूनही सुरुच आहे. दरम्यान आरोपीच्या आत्याने पुणे पोलीस व बालहक्क मंडळाच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टाने त्यांना पुन्हा केलेली अटक चुकीची होती असे म्हणत आरोपीला तात्काळ तुरुंगातून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ता आरोपीचा ताबा त्याच्या आत्येकडे देण्यात आला आहे.