राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे. तळकोकणात देखील पावसाने धुमाकूळ घातला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. कोकणातील तीनही जिल्ह्यांतील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कुडाळ येथे पाणी आल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.
दरम्यान आज रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ल्यावर ढगफुटीसदृश पाऊस झाला. पायी वाटेवर पाणी अक्षरशः धबधब्यासारखे वाहत होते. त्यामुळे अनेक पर्यटक तिथे अडकले होते. सध्या अडकलेल्या पर्यटकांना रोप-वे च्या साहाय्याने खाली आणले जात आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला असून पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तसेच सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेले पर्यटक यांना रोपवे ने गडाखाली आणले जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच चिपळूण शहरातून वाहणारी वाशिष्ठी नदी देखील काल रात्रीच्या सुमारास इशारा पातळीच्या जवळपास वाहत होती. नदीचे पाणी सखल भागात शिरले होते. शहरातील अनेक सखल पाणी साठले होते. मात्र रात्री पावसाचा जोर थोडासा ओसरला असल्याने सध्या चिपळूणवरील पुराचे संकट टळले आहे.