संसदेच्या अधिवेशनात बोलताना विरोधी पक्षनेते व खासदार राहुल गांधी यांच्या भाषणावरून बरेच राजकीय वाद पाहायला मिळत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी यांनी ‘हिंदू’ धर्माबद्दल वक्तव्य केले होते. दरम्यान हे वक्तव्य हिंदू धर्माच्या विरोधात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला होता. त्यांच्या भाषणातील या विषयावरील भाग संसदेच्या कामकाजातून देखील वगळण्यात आला होता. दरम्यान सर्वच स्तरातून राहुल गांधी यांच्या विधानाचा विरोध केला जात असताना दुसरीकडे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राहुल गांधींच्या भाषणाबाबत मोठं विधान केलं आहे.
‘हिंदू’ धर्माबद्दल काय म्हणाले होते राहुल गांधी?
संसदेत बोलत असताना राहुल गांधी यांनी हिंदू धर्माविषयी वक्तव्य केलं होतं. संसदेत आपल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले, ”हिंदू कधीही हिंसा करू शकत नाहीत. कधीही द्वेष, हिंसा, भीती पसरवू शकत नाहीत. मात्र समोर बसलेले लोक (भाजप) हिंदू नाहीयेत. कारण ते कायम हिंसेबद्दल बोलत असतात. नरेंद्र मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच पूर्ण हिंदू समाज नाही. सत्यापासून दूर जाऊ नये, हिंदू धर्मात हिंसेला स्थान नाहीये, असे स्पष्टपणे म्हटलेले आहे.”
राहुल गांधी यांचे वक्तव्य हिंदूंच्या विरोधात असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. यावर बोलताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याची पाठराखण केली आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावर बोलताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, ”आम्ही राहुल गांधींचे संसदेतील पूर्ण भाषण ऐकलं आहे. आपल्या भाषणात ते काहीही चुकीचे बोलले नाहीयेत. ते म्हणत आहेत हिंदू धर्मात हिंसेला स्थान नाहीये. ते असे स्पष्टपणे म्हणत असताना त्यांनी हिंदू धर्माच्या विरोधात काही वक्तव्य केलं असं म्हणणे, त्यांच्या भाषणातील निवडक भाग काढून प्रसारित करणं हा अपराध असल्याचे आम्हाला वाटते. असे करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.”
पुढे बोलताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, ”एखाद्या व्यक्तीने जे म्हटलेच नाहीये त्यासाठी त्याला विरोध करणं, दोषी समजणं हे चुकीचं आहे. हिंदू हिंसा करू शकत नाहीत असे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यांनी समोर बसलेल्या पक्षाला उद्देशून म्हटलं आहे की, तुम्ही स्वतःला हिंदू म्हणवता आणि हिंसेचे समर्थन करता. आम्ही त्यांचे पूर्ण भाषण ऐकले आहे. त्यात आम्हाला काहीही चुकीचं वाटलेलं नाही.”