झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतल्याच्या काही दिवसांनंतर, हेमंत सोरेन (Hemant Soren ) यांनी आज राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनात फ्लोअर टेस्ट जिंकत आपल्याकडे बहुमत असल्याचे सिद्ध केले आहे. हेमंत सोरेन यांनी त्यांच्या बाजूने ४५ आमदारांची मते घेऊन विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यांनी झारखंडचे 13वे मुख्यमंत्री म्हणून रांचीच्या राजभवनात 4 जुलै रोजी शपथ घेतली होती. दरम्यान त्यांना झारखंड हायकोर्टाने जामीन दिला होता. मात्र आता पुन्हा त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाला ईडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. झारखंड उच्च न्यायालयाने ३ जुलै रोजी हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केला होता. झारखंड हायकोर्टाने सोरेन यांना जामीन मंजूर करताना सांगितले होते की, त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. ईडीने हेमंत सोरेन यांची चौकशी केल्यानंतर 31 जानेवारीला अटक केली होती. सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकीपूर्वी हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात अंतरिम जामिनाची मागणी करणारी याचिका दाखल केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता. जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांची 28 जून रोजी बिरसा मुंडा तुरुंगातून सुटका झाली. 31 जानेवारी रोजी अटक होण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जानेवारीमध्ये कथित जमीन घोटाळा आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती.