मनसेचे माजी नेते, पुणे लोकसभेचे अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी आज मोठे शक्तिप्रदर्शन करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी ठाकरेंची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत संकेत दिले होते. वसंत मोरे हे आज पुण्यातून अनेक गाड्यांचा ताफा घेत, हातात भगवे झेंडे घेत मुंबईत दाखल झाले. दरम्यान वसंत मोरे यांनी अखेर हाती शिवबंधन बांधले आहे. बऱ्याच दिवसांनी पाऊस आला आणि वसंतही आला असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी मोरेंचे स्वागत केले.
उद्धव ठाकरेंनी देखील वसंत मोरेंचे पक्षात स्वागत केले. स्वागत करताना, ”तुम्ही सर्वजण जुने शिवसैनिक आहात. तुमचा पक्षात प्रवेश नसून, तुम्ही स्वगृही परतत आहात. मात्र तुम्हाला शिवसेना सोडल्याची शिक्षा द्यायला हवी. आता पुण्यात शिवसेना वाढवा ही शिक्षा मी तुम्हाला देत आहे.” आज मातोश्री येथे वसंत मोरे यांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱयांनी शिवबंधन बांधले. यावेळी खासदार संजय राऊत आणि आमदार सचिन अहिर उपस्थित होते.
आपल्या पक्षात प्रवेश केला नसून, स्वगृही परत आलो असे शिवबंधन हाती बांधल्यावर वसंत मोरे म्हणाले आहेत. दरम्यान याआधी वसंत मोरे हे पुण्याचे माजी नगरसेवक राहिलेले आहेत. ते महाराष्ट्र नवनिर्माण पक्षात होते. मात्र अंतगर्त कलहामुळे त्यांनी माणसे पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे हे अपक्ष निवडणुकीला उभे राहिले. मात्र त्यांचा दारुण पराभव झाला. तसेच त्यांचे डिपॉझिट देखील जप्त झाले. मुरलीधर मोहोळ हे महायुतीचे उमेदवार मोठ्या बहुमताने विजयी झाले.