उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) उन्नावमध्ये (Unnao) आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. उन्नावमधील एक डबल डेकर बस दुधाच्या डब्यात घुसल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर भरधाव वेगात बस दुधाच्या कंटेनरवर आदळल्याने भीषण अपघात झाला.या अपघातात 18 जण जागीच ठार झाले तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
आज पहाटे 5.15 वाजता ही घटना घडली.घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही डबल डेकर बस नियंत्रणाबाहेर गेली आणि दुधाच्या कंटेनरला जाऊन धडकली, त्यानंतर हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, खूप मोठा आवाज आजूबाजूच्या लोकांना ऐकू गेला तो ऐकून आसपासच्या गावातील लोक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सदर अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली.
उन्नोचे डीएम गौरांग राठी म्हणाले की, “आज पहाटे 05.15 च्या सुमारास मोतिहारी, बिहार येथून येत असलेल्या एका खासगी बसची दुधाच्या टँकरला धडक बसली. या अपघातात 18 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जखमी झाले आहेत. बस ओव्हरस्पीड करत असल्याचे प्राथमिक तपासानंतर समोर आले आहे.आता जखमींवर उपचार सुरू आहेत”
या घटनेबाबत बोलताना उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले, “18 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ३० हुन जास्त जखमी झाले असून, त्यांना उन्नाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जखमींना उच्चस्तरीय रुग्णालयात हलवण्यात येत आहे. उन्नावजवळील सर्व रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. केजीएमओचे ट्रॉमा सेंटर अलर्टवर आहे आणि सर्व जखमी लोक बिहारचे आहेत आणि आम्ही बिहार सरकारच्या संपर्कात आहोत, चौकशीनंतर कळेल. जखमींना योग्य उपचार देणे हे आमचे प्राधान्य आहे.”
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आणि जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
एक्स वर, मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले आहेत की, “उन्नाव जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात झालेली जीवितहानी अत्यंत दु:खद आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. माझ्या शोकसंवेदना शोकग्रस्त कुटुंबांसोबत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या घटनेनंतर सर्व जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असून कांहींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
उन्नावचे पोलिस अधीक्षक, क्षेत्र अधिकारी बांगरमाऊ आणि इतर पोलीस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी उपस्थित आहेत. बसचा क्रमांक UP95 T 4720 असून दुधाने भरलेल्या कंटेनरचा क्रमांक UP70 CT 3999 आहे. मृतांमध्ये 14 जणांची ओळख पटली आहे. तर, इतर मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.