Marathwada Vidarbha Earthquake: मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील वाशीम जिल्ह्यात आज, बुधवारी सकाळी 7 वाजून 15 मिनीटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. . रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी मोजली गेली.सुदैवाने या भूकंपात कुठल्याही जीवितहानीचे वृत्त नाही. दरम्यान या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
यासंदर्भातील समोर आलेल्या माहितीनुसार आज बुधवारी सकाळी 7.15 वाजता परभणी शहर, सेलू, गंगाखेड आदी भागात भूकंपाचा हा धक्का जाणवला आहे. अचानकपणे जमीन हादरल्याने अनेक ठिकाणी लोक भयभीत होऊन घराबाहेर आले. तसेच हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात या भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले होते. या भूकंपाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यासोबतच मराठवाड्यालगत असलेल्या वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. सकाळी 7 वाजून 9 मिनिटांनी आणि 7 वाजून 14 मिनिटांनी 2 वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले.
जयपूर, टनका, सोंडा, सावळी कृष्णा या गावात परिसरात घरावरील टीन पत्राचा मोठा आवाज झाला. गोठ्यात बांधलेली गुरेदेखील या भूकंपामुळे भयभीत झाल्याचे पाहायला मिळाले.
जनावरे सैरावैरा होऊन बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. मात्र या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.