भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली आहे. राहुल द्रविडचा कार्यकाळ ICC T20 वर्ल्ड कपनंतर संपला आणि तेव्हापासून हे पद रिक्त होते. बीसीसीआयच्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने टी-२० विश्वचषकादरम्यानच गौतम गंभीर आणि डब्ल्यूव्ही रमन यांची मुलाखत घेतली होती. जेव्हा टीम इंडिया वादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकली होती, तेव्हा जय शाह यांनी मुंबईत पोहोचल्यानंतर सर्व पक्षांशी बोलल्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली जाईल, असे स्पष्ट केले होते.
गौतम गंभीरच्या नावाची घोषणा करताना जय शाह यांनी ट्विट केले की, “भारतीय क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आधुनिक क्रिकेट झपाट्याने विकसित झाले आहे आणि गौतमने हे बदलते परिदृश्य जवळून पाहिले आहे. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अडचणींचा सामना केल्याने आणि विविध भूमिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असताना, मला विश्वास आहे की गौतम भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी सक्षम व्यक्ती आहे.”
जय शाह गंभीरबद्दल पुढे म्हणाले, “टीम इंडियासाठी त्याची स्पष्ट दृष्टी, त्याच्या अफाट अनुभवासह, त्याला ही रोमांचक आणि सर्वात मागणी असलेली कोचिंगबद्दलची भूमिका पूर्ण करण्यास सक्षम बनवते. त्याच्या या नव्या प्रवासाला बीसीसीआयचा पूर्ण पाठिंबा आहे.” भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविडची जागा गौतम गंभीर घेणार आहे. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2007 नंतर प्रथमच आयसीसी टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला.