महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकणात तर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोकणातील या तीनही जिल्ह्यात अत्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाचा फटका हा कोकण रेल्वेला देखील बसला आहे. समुद्र देखील खवळला असून, मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
काल चिपळूण शहरात देखील अति ते अति मुसळधार पाऊस झाला. दरम्यान सलग झालेल्या पावसामुळे आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे चिपळूणची वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत आहे. काल नदीचे पाणी शहरातील सखल भागात शिरण्यास सुरूवात झाली होती. मात्र संध्याकाळच्या सुमारास पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने आणि ओहोटी आल्याने शहरावरील पुराचा धोका तूर्तास टळला आहे.
१८ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यास पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, सिंधुदर्गला ओरेन अलर्ट तर पुणे, नागपूर, रायगड आणि गडचिरोली भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे पर्यटनाला जाताना नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि स्वतःची काळजी घ्यावी, तसेच नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणात सध्या अत्यंत मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, महामार्गावर पाणी येणे अशा घटना घडत आहेत. दरम्यान चेपून शहरात एक मनाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. चिपळूणमधील डीबीजे कॉलेजची संरक्षक भिंत कोसळली आहे. भिंत कोसळल्यामुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
मुसळधार पाऊस सुरू असल्याने कॉलेजची सरंक्षक भिंत कोसळली. यामध्ये गाडला गेल्यामुळे या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चिपळूणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेला विद्यार्थी बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरू होता. अखेर या मातीखाली त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. चिपळूण पोलीस घटनास्थळी पोचले असून, पुढील कारवाई केली जात आहे.