स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराजने टेनिसची तिसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे विम्बल्डन २०२४ जिंकली आहे. सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा पराभव करून त्याने हे ग्रँडस्लॅम जिंकले आहे. त्यामुळे सर्वाधिक ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपदे (पुरुष आणि महिला) जिंकणारा खेळाडू होण्याचे जोकोविचचे स्वप्न भंगले आहे. विम्बल्डन 2024 चा अंतिम सामना रविवारी खेळला गेला. जिथे २१ वर्षीय कार्लोस अल्काराझने चमकदार कामगिरी करत नोव्हाक जोकोविचचा सरळ सेटमध्ये ६-२, ६-२, ७-६ असा पराभव केला. आणि विम्बल्डनचे जेतेपद पटकावले.
अल्काराज आणि जोकोविच यांच्यातील हा जेतेपदाचा सामना 2 तास 27 मिनिटे चालला. अल्काराझने सुरुवातीपासूनच सामन्यात आपले वर्चस्व कायम राखले. पहिले दोन सेट त्याने जिंकले होते. यानंतर जोकोविचने तिस-या सेटमध्ये जोरदार खेळ केला. मात्र तो खेळाला कलाटणी देण्यात यशस्वी होऊ शकला नाही. तिसरा सेट अतिशय रोमांचक होता. तिसऱ्या सेटमध्ये अल्काराझ 5-4 ने आघाडीवर होता, पण जोकोविचने असा खेळ केला की त्याने 6-6 अशी बरोबरी साधली आणि सेट टायब्रेकपर्यंत नेला. पण इथे पुन्हा अल्काराझने वर्चस्व गाजवले. टायब्रेकरमध्ये अल्काराझने 7-4 गुणांच्या फरकाने सेट जिंकला आणि तिसरा सेट 7-6 असा जिंकून विजेतेपदावर नाव कोरले. स्पॅनिश टेनिसपटूने आतापर्यंत 4 ग्रँड स्लॅम फायनल खेळल्या आहेत आणि त्या सर्व जिंकल्या आहेत. म्हणजेच आजपर्यंत तो अंतिम फेरीत हरलेला नाही. २१ वर्षीय अल्काराज हा गवत, क्ले आणि हार्ड कोर्ट या तीनही प्रकारच्या कोर्टवर ग्रँड स्लॅम ट्रॉफी जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू आहे.