संसदेत घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आज, सोमवारी न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. आता या प्रकरणातील आरोपींना 2 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करून सुनावणी करण्यात येणार आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 7 जून रोजी या प्रकरणीतील मनोरंजन डी, ललित झा, अमोल शिंदे, महेश कुमावत, सागर शर्मा आणि नीलम आझाद या सर्व 6 आरोपींच्या विरोधात सुमारे 1000 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत 6 आरोपींवर खटला चालवण्याची परवानगी दिली आहे.
या लोकांवर 13 डिसेंबर 2023 रोजी सभागृहाच्या कामकाजादरम्यान संसदेवर हल्ला केल्याचा आरोप आहे.मनोरंजन डी, सागर शर्मा, अमोल धनराज शिंदे, नीलम, ललित झा आणि महेश कुमावत यांनी बेकायदेशीरपणे संसदेत प्रवेश केल्याचा आरोप आहे. तसेच चालू अधिवेशनात लोकसभेत धुराचे डबे फेकण्यात आले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी उपराज्यपालांना यूएपीएच्या कलम 16 आणि 18 अंतर्गत खटला चालवण्याची विनंती केली होती. रेकॉर्डवर पुरेशी सामग्री एकत्रित झाल्यानंतर उपराज्यपालांनी खटला चालवण्यास मंजुरी दिली.ही मंजुरी देण्यापूर्वी, पुनरावलोकन समितीने (डीओपी, तीस हजारी, दिल्ली) 30 मे रोजी तपास यंत्रणेने गोळा केलेले संपूर्ण पुरावे देखील तपासले.
तपासादरम्यान संसद हल्ला प्रकरणात आरोपींचा सहभाग आढळून आला. हे पाहता, पुनरावलोकन समितीला असे आढळून आले की युएपीए अंतर्गत आरोपींविरुद्ध प्रथमदर्शनी खटला चालवला जावा. लोकसभेत सुरक्षा अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी संसद मार्ग पोलिस ठाण्यात आयपीसी आणि यूए(पी) कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला. नंतर या प्रकरणाचा तपास संसद मार्ग पोलीस ठाण्यातून पीएस स्पेशल सेल,नवी दिल्लीच्या काउंटर इंटेलिजन्स युनिटकडे वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान उपरोक्त 6 आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.