दिल्ली मद्य धोरण प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती.परंतु, आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी 7 ऑगस्टला होणार आहे. तोपर्यंत केजरीवाल तिहार तुरुंगातच राहणार आहेत.
केजरीवाल यांना 20 जून रोजी राऊस एव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला होता. परंतु, 21 जून रोजी ईडीने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर 25 जून रोजी सुनावणी झाली. तेव्हा ईडीने हायकोर्टात सांगितले होते की, ट्रायल कोर्टाने आमची बाजू नीट ऐकून घेतली नाही.
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर हायकोर्टाने म्हटले – चर्चा योग्य पद्धतीने झाली नाही, त्यामुळे आम्ही राऊस ॲव्हेन्यू कोर्टाचा निर्णय रद्द करतो.कोर्ट म्हणाले की, निर्णय पाहता केजरीवाल यांना जामीन देताना विवेकाचा वापर करण्यात आला नाही असे दिसते. न्यायालयाने ईडीला युक्तिवाद करण्यासाठी पुरेशी संधी द्यायला हवी होती.असेही त्यांनी म्हंटले आहे.
ईडीशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर सीबीआयचा खटलाही सुरू आहे. गेल्या12 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने ईडी प्रकरणात केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता,परंतु हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केले होते. मात्र यावरील सुनावणीची तारीख अदयाप जाहीर करण्यात आलेली नाही.