उद्या आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी निमित्त अनेक भाविक उपवास करतात. उपवासाच्या विविध पदार्थांची चव या दिवशी चाखली जाते. परंतु मार्च महिन्यात उपवासाच्या अन्नपदार्थांमधून नागपुरात जवळपास १००वर जणांना झालेल्या विषबाधेच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संभव्य अपाय टाळण्यासाठी यावेळी नागरीकांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. भगर, साबुदाणा, सिंगाडा पिठ, राजगिरा पिठ विकत घेताना किंवा उपवासाचे तयार पदार्थ विकत घेताना ते पॅकबंद विकत घ्या, असे आवाहन केले आहे.
महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त शिंगाड्याचे पीठ व उपवास भाजणी पीठापासून तयार केलेल्या खाद्य पदार्थ खाल्ल्याने मेयो, मेडिकलसह इतरही शासकीय व खासगी रुग्णालयात विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढली होती. याची खबरदारी घेत ‘एफडीए’ने सोमवारी प्रसिद्ध पत्रक काढून नागरिकांना सतर्क राहण्याचा सूचना दिल्या आहेत.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, भगरीवर मोठया प्रमाणात ‘अस्परजिलस’ या प्रजातीच्या बुरशीचा प्रभाव असतो. ज्यामुळे ‘फ्युमिगाक्लेविन’ या सारखे विषद्रव्य तयार होतात. जुलै महिन्यातील तापमान व आद्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकुल असते. अशा बुरशीचा प्रादूर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होवू शकते. त्याअनुषंगाने नागरीकांनी, अन्न व्यवसायिक व हॉटेल चालकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
तसेच दुकानदारांनी भेसळयुक्त किंवा तारीख उलटून गेलेले खाद्यपदार्थ किंवा कच्चा माल विकू नये असे आवाहन दुकानदारांना करण्यात आले आहे.