जम्मू काश्मीरमध्ये गेल्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला आहे. जम्मू काश्मीरला अशांत करण्याचं प्रयत्न केला जात आहे. मात्र आपले शूर जवान दहशतवाद्यांचा प्रत्येक प्रत्येकी प्रयत्न हाणून पाडत आहेत. जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह पाच जवान शहीद झाले आहेत. जम्मू विभागातील डोडापासून 300 किमी अंतरावर असलेल्या कोटी गावातील शिया धार चौंड माता वनक्षेत्रात काल संध्याकाळी ही चकमक झाली.
दहशतवाद्यांच्या या नापाक कृत्याला भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलीस जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत. सुरक्षा दलांनी वेगवेगळ्या चकमकीत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी अजूनही शोधमोहीम सुरू आहे.डोडा येथील देसा वनपरिक्षेत्रातील धारी गोटे उर्बगी येथे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू झाली होती. दरम्यान, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि घनदाट जंगलात लष्कराच्या जवानांनी त्यांचा पाठलाग केला. रात्री ९ वाजताच्या सुमारास पुन्हा जंगलात गोळीबार झाला ज्यात लष्कराच्या अधिकाऱ्यासह ५ जवान शहीद झाले.
सर्वप्रथम, 9 जून रोजी दहशतवाद्यांनी जम्मूच्या रियासी येथे यात्रेकरूंनी भरलेल्या बसला लक्ष्य केले, ज्यामध्ये 9 लोक मारले गेले. ही बस यात्रेकरूंना माता वैष्णोदेवी मंदिरात घेऊन जात होती. त्यानंतर वाटेत दहशतवाद्यांनी बसला घेरले. ड्रायव्हरला आधी गोळी मारण्यात आली. त्यानंतर बस खड्ड्यात पडली. तरीही दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला. या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून 41 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेकांनी दगड आणि झाडांच्या मागे लपून आपले प्राण वाचवले.
दुसरी घटना कठुआ येथील आहे. जिथे ११ जून रोजी दहशतवादी एका गावात घुसले होते. यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आणि आमच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईत सीआरपीएफचा एक जवानही शहीद झाला.7 जुलै रोजी राजौरी येथील लष्कराच्या छावणीवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. अंधाराचा फायदा घेत दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले.
8 जुलै रोजी कठुआमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड फेकले आणि गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात ५ जवान शहीद झाले आहेत. 10 जुलै रोजी राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. संशयित दहशतवाद्यांच्या एका गटाने रात्री भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना यश आले नाही. सुरक्षा दलांनी त्याचे मनसुबे उधळून लावले.