आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेत सपत्नीक सहभाग घेतला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील चार पिढ्या उपस्थित होत्या.स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी, वडिल संभाजीराव शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली, नातू रुद्रांश हे या पूजेत सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी “विठुरायाला चांगला पाऊस होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे”, असे साकडे विठ्ठलाला घातले.
“पांडुरंगाच्या आशीर्वादाने सलग तीन वर्षे विठ्ठलाची महापूजा करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. पाऊस चांगला झाला आहे. पेरण्या झाल्या, दुबार पेरणीचे संकट नाही. यंदा मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार चांगले काम करत आहे. चांगला पाऊस होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे. या राज्यातील प्रत्येक घटक सुखी आणि समृद्धी झाला पाहिजे” , असे साकडे एकनाथ शिंदे यांनी यावेळी विठ्ठलाला घातल्याचे सांगितले .
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय 55 वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय 50 वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. अहिरे दाम्पत्य गेल्या 16 वर्षापासून नियमितपणे वारीला येत आहेत.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, स्वास्थ परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार समाधान आवतडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की हे सरकार सर्वसामान्याचे आहे.त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आजच्या दिवशी पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे की राज्यातील शेतकरी, कामगार व कष्टकरी सुखी झाला पाहिजे. यासाठी हे शासन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मोफत तीन गॅस सिलेंडर योजना, बेरोजगार तरुणांसाठी अप्रेंटिस योजना आदी योजनेच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.