राज्यातील वातावरणात सतत बदल पाहायला मिळत आहेत. मान्सूनने अख्खे राज्य व्यापले आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह कोकणात पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे. दरम्यान, पुढील २४ ते ३६ तास मुंबईसह कोकणासाठी महत्वाचे असणार आहेत.
आज दुपारनंतर पुढील २४ ते ३६ तास मुंबईसह कोकणात माध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उद्या आणि पर्वा पावसाचा जोर जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध भागात आजही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
रायगड,सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण, संगमेश्वर आदी शहरात पावसाचे पाणी शिरले आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली असून नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.