महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. आता शरद पवारांविरोधात बंड करून एनडीए सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. अजित गटातील राष्ट्रवादीच्या चार बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) पिंपरी-चिंचवड शाखा प्रमुख अजित गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड विद्यार्थी संघटनेचे प्रमुख यश साने, माजी नगरसेवक राहुल भोसले आणि पंकज भालेकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
भोसरीची विधानसभेची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीला मिळवून देण्याचे सर्व प्रयत्न फसल्याने गव्हाणे यांनी राजीनामा दिला. नुकतेच शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या फुटलेल्या गटातील काही आमदारांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची भेट घेतल्याचा दावा केला होता. आता महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अजित पवार यांची साथ सोडून शरद पवारांशी हातमिळवणी करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या (UBT) एका ज्येष्ठ नेत्याने भुजबळांची भेट घेतली होती. बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक हरल्यानंतरही अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिल्याने भुजबळ संतापले असल्याचे बोलले जात आहे. राज्यसभेच्या जागेसोबतच भुजबळांना केंद्रीय मंत्रीपदही हवे होते, अशी चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा जिंकल्या. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळाली, तर शरद पवार गटाला 8 जागा जिंकण्यात यश आले.पिंपरी चिंचवड येथे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. राजीनामा दिलेल्या सर्व पदाधिकाऱयांनी अपले राजीनामे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडे सोपवले आहेत. त्यानंतर आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये या सर्वानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे.