अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये एका अधिवेशनामध्ये हजर झाले होते. शनिवारी हत्येच्या प्रयत्नातून वाचल्यानंतर ते प्रथम सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आले. शनिवारी एका प्रचार रॅलीत ट्रम्प स्टेजवर होते तेव्हा त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारानंतर काही तासांनी ट्रम्प म्हणाले की, गोळी त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला चाटून गेली होती. या गोळीबारात रॅलीतील एकाचा मृत्यू झाला, तर आणखी दोन जण गंभीर जखमी झाले. दरम्यान आता रिपब्लिकन पक्षाने पुन्हा एकदा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. मिलवॉकी येथे झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात एकामागून एक राज्यांनी ट्रम्प यांच्या नावाला पाठिंबा दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला होता. ते 20 जानेवारी 2017 ते 20 जानेवारी 2021 पर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष होते. पुढच्या निवडणुकीत त्यांचा डेमोक्रॅट पक्षाच्या जो बायडेन यांच्याविरुद्ध पराभव झाला. मात्र, तरीही त्यांनी पराभव स्वीकारला नाही आणि व्हाईट हाऊस रिकामे करण्यापूर्वी तेथे जमलेल्या ट्रम्प समर्थकांनी हिंसक गोंधळ निर्माण केला. अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर गेल्या 4 वर्षात त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले, ज्यामध्ये गुप्त कागदपत्रे चोरण्यापासून ते अनैतिक संबंधांमुळे महिलेला पैसे देण्यापर्यंतचे गुन्हे दाखल झाले आणि त्यांना शिक्षाही झाली. एवढे सगळे करूनही ट्रम्प यांना उमेदवारीपासून रोखता आले नाही. दोनच दिवसांपूर्वी ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि त्यांच्या कानाला गोळी लागली होती.
एवढे सगळे करूनही ट्रम्प यांची लोकप्रियता अमेरिकेत झपाट्याने वाढत आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन ट्रम्प यांचा पुन्हा एकदा सामना डेमोक्रॅट पक्षाच्या जो बायडेन यांच्याशी होऊ शकतो. मात्र, वाढते वय आणि त्यातून निर्माण होणारी लक्षणे पाहता जो बायडेन यांच्या उमेदवारीवर साशंकता निर्माण झाली असून विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस याही डेमोक्रॅट पक्षाकडून उमेदवार होऊ शकतात, अशी चर्चा आहे.