सध्या महाराष्ट्रात येत्या एक दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे देखील सुरू झाले आहेत. या दौऱ्यांसाठी बऱ्याचदा राजकीय नेत्यांकडे हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. कारण त्यांना राज्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एकाच दिवसात अनेक दौरे करावे लागतात. हेलिकॉप्टर प्रवासात राजकीय नेत्यांची विशेष काळजी घेतली जाते. आज गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील एका कार्यक्रमाच्या भूमिपूजनासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्रित हेलिकॉप्टरने प्रवास करत होते. त्यावेळी अजित पवारांनी हेलिकॉप्टर प्रवासाचा आलेला अनुभव सांगितला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील वडला पेठ येथील सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या आयरन उत्पादन करणारे कारखान्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आज मुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी एकाच हेलिकॉप्टर मधून प्रवास केला. यावेळी गडचिरोलीकडे येताना हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर पोटात गोळा आल्याचा प्रसंग उभा राहिल्याचे अजित पवारांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले, “नागपुरातून हेलिकॉप्टरने उड्डाण केले, तेव्हा छान वाटत होते मात्र जसे गडचिरोली जवळ आम्ही आलो हेलिकॉप्टर ढगांमध्ये शिरले, तेव्हा माझ्या पोटात गोळा आला. मी इकडे तिकडे पाहत होतो. सर्व घाबरल्यासारखे झाले होते. मात्र देवेंद्र फडणवीस निवांत होते. मी त्यांना म्हणालो पहा आपण ढगात जात आहोत तेव्हा फडणवीस म्हणाले, घाबरू नका. आजवर माझे सहा एक्सीडेंट झाले आहेत. मला मात्र कधीही काही झाले नाही मी हेलिकॉप्टर मध्ये असलो तर कधीही काही होत नाही. आणि आमचे हेलिकॉप्टर सुखरूप लँड झाले.”
गडचिरोली जिल्हा तसा दुर्गम भाग असला तरी निसर्गाने या भागाला भरभरून दिले आहे. सुरजागड येथील खाणीत हजारो कोटी रुपयांचा लोह खनिज आहे. सुरजागड इस्पात या कंपनीने या ठिकाणी कारखाना सुरू केला आहे. धर्मराव बाबा आत्राम यांचे खास कौतुक केले पाहिजे त्यांनी आपली वडीलोपार्जित दीडशे एकर जमीन या कारखान्यासाठी दिली, असे अजित पवार म्हणाले.