आजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु या उक्तीप्रमाणे वारकऱ्यांसाठी आज महत्वाचा दिवस आहे. कारण आज आषाढी वारीचा सोहळा साजरा होत आहे. दरवर्षी लाखो वारकरी या सोहळ्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. आज चंद्रभागेचा तीर वारकऱ्यांनी फुलून गेला आहे. जमलेले सर्व वारकरी हरिनामाच्या गजरात तल्लीन आहेत.
आषाढी एकादशी निमित्त आज पंढरपूर मध्ये विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनाला मोठ्या संख्येने भाविक पोहचले आहेत. सध्या 24 तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलं आहे मात्र तुम्ही आज पंढरपूरामधून दर्शन घेऊ शकत नसलात तरीही ऑनलाईन पंढरपूरातील विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेण्याची सोय आहे. यंदा विठ्ठल रूक्मिणीला चांदीची मेघ डंबरी आहे. त्यांना भरजरी वस्त्र परिधान करण्यात आली आहे. यामध्ये दोघांचेही रूप मोहक दिसत आहे.
तीर्थक्षेत्र पंढरपूरचा आषाढी सोहळा आज बुधवारी भक्तिमय वातावरणात व प्रचंड उत्साहात साजरा होत आहे. संतांच्या पालख्या मंगळवारी सायंकाळी तीर्थक्षेत्र पंढरपुरात दाखल झाल्या आहेत.सध्या पंढरीत सुमारे 20 लाखांहून अधिक भाविक आहेत.श्री विठ्ठल मंदिराचे महाद्वार, पश्चिमद्वार, नगरप्रदक्षिणा मार्ग, वीर सावरकर पथसह भवताल गर्दीने फुलून गेला आहे. या भागांत व्यापार्यांनी दुकाने थाटली आहेत.
अतिशय सुंदर मांडणी,आकर्षक वीज व्यवस्था, यामुळे मंदिर परिसरातील दुकाने लक्ष वेधून घेत आहेत. प्रसाद, कुंकू-बुक्का, उदबत्ती, तुळशीच्या माळा, गोपीचंदन, टाळ, मृदंग, वीणा, तबला, बांगड्या, देवाचे फोटो, आध्यात्मिक ग्रंथ, चुरमुरे, पेढा-बर्फी आदींची दुकाने लक्षवेधी ठरत आहेत. याठिकाणी खरेदीसाठी भाविकांची लगबग दिसून येत आहे. याशिवाय घोंगडी, सोलापुरी चादर अशा जिन्नसांची दुकानेही ग्राहकांच्या स्वागतास सज्ज आहेत. दरम्यान, पालख्या वाखरीत दाखल होताच पावसाने जोरदार हजेरी लावली. या अगोदर जूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला होता. या पावसामुळे भाविकांचा उत्साह दुणावला आहे. राज्यासह परराज्यांतून आलेल्या वैष्णवांमुळे पंढरीत भाविकांचा महासागर उसळला असल्याचे चित्र दिसून येत आहे.