खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या बिभव कुमारविरुद्ध दिल्ली पोलिसांनी मंगळवारी तीस हजारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आज बिभव कुमारची न्यायालयीन कोठडी संपत होती, त्यानंतर त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गौरव गोयल यांनी आरोपपत्राची दखल घेत ३० जुलै रोजी सुनावणी घेण्याचे आदेश दिले. तीस हजारी कोर्टात बिभव कुमारची न्यायालयीन कोठडी ३० जुलैपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्ली पोलिसांनी सुमारे पाचशे पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, त्यात बिभवला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८, ३४१, ३५४, ३५४बी, ५०६,५०९ आणि २०१ अंतर्गत आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी पुरावा म्हणून केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाचे सीसीटीव्ही फुटेज आणि फोनसह बिभव यांचे सिमकार्ड दिले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान दिल्ली पोलिसांनी सुमारे शंभर जणांची चौकशी केली होती आणि 50 साक्षीदार बनवले होते.
दिल्ली उच्च न्यायालयाने 12 जुलै रोजी बिभव कुमारचा जामीन अर्ज फेटाळला होता. याआधी, तीस हजारी न्यायालयाने ७ जून रोजी बिभव कुमारची दुसरी जामीन याचिका फेटाळली होती. या प्रकरणाचा तपास अद्याप प्राथमिक अवस्थेत असून पीडितेला तिच्या सुरक्षेची काळजी असल्याचे तीस हजारी न्यायालयाने म्हटले होते. स्वाती मालीवाल या आम आदमी पक्षाच्या खासदार असून त्या आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटायला गेल्या होत्या, असे तीस हजारी न्यायालयाने म्हटले होते. बिभव कुमारला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो, अशीही शक्यता असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
दिल्ली पोलिसांनी 18 मे रोजी बिभव कुमारला अटक केली होती. या प्रकरणी स्वाती मालीवाल यांनी 17 मे रोजी कोर्टात जबाब नोंदवला होता. घटना १३ मेची आहे. 16 मे रोजी दिल्ली पोलिसांनी स्वाती मालीवाल यांचा जबाब नोंदवून एफआयआर नोंदवला. बिभव कुमारने याआधी दिल्ली उच्च न्यायालयात आपल्या अटकेला आव्हान देणारी दुसरी याचिका दाखल केली असून त्यावर उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. बिभव कुमारने अटकेला आव्हान देत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.