अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 1392 कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणी आज हरियाणामध्ये छापेमारी केली आहे.
राज्यातील काँग्रेस आमदार राव दान सिंह यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली आहे त्यासोबतच ईडीने मेटल फॅब्रिकेटिंग कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांच्या परिसरात छापे टाकले.हरियाणातील महेंद्रगड, बहादुरगड आणि गुरुग्राम, दिल्ली आणि जमशेदपूरसह सुमारे 15 ठिकाणांचा शोध घेण्यात येत आहे.
महेंद्रगड मतदारसंघातील आमदार रावदान सिंह, त्यांचा मुलगा अक्षत सिंग, कंपनी अलाईड स्ट्रिप्स लिमिटेड (एएसएल) आणि तिचे प्रवर्तक मोहिंदर अग्रवाल, गौरव अग्रवाल आणि इतर काही लोकांचा यात समावेश आहे. एएसएल कंपनी कोल्ड रोल स्टील उत्पादने तयार करते.
कंपनीवर 1392 कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप असून सीबीआयने याप्रकरणी 2022 मध्ये गुन्हा दाखल केला होता. आमदार राव दान सिंग यांच्या कुटुंबाने आणि त्यांच्या या कंपन्यांनी एएसएलकडून कर्जाचे पैसे घेतले पण ते परत केले नाहीत आणि नंतर पैसे माफ केल्याचा आरोप आहे.