इंडी आघाडीच्या नेत्यांनी गजापूर येथे जाऊन विशिष्ट लोकांना साहाय्य करणे हे ‘पुतना मावशी’चे प्रेम आहे. हे साहाय्य करण्यासाठी गेल्यावर एक ज्येष्ठ मुस्लीम बांधव काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांना गडदुर्गप्रेमी हे शिवभक्त आहेत का ? अतिरेकी असा प्रश्न केल्यावर शाहू महाराज यांनी ‘अतिरेकी’ असे उत्तर दिले. त्यामुळे काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी हिंदूंना ‘अतिरेकी’ म्हणणे दुर्दैवी आहे, असे मत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
धनंजय महाडिक पुढे म्हणाले, ‘‘गडदुर्ग हा आपल्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडदुर्ग अतिक्रमणमुक्त होण्यासाठी सहस्त्रो शिवभक्त त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. असे असतांना त्यांना ‘अतिरेकी’ म्हणण्यात आले. असे म्हणणे हा महाविकास आघाडीचा ‘अजेंडा’ आहे का ? हे पडताळून पहावे लागेल. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी लोकसभेत हिंदूंविषयी ‘हिंसक’ असा शब्द वापरतात. त्यामुळे काँग्रेसचे नेते नेमके कोणासमवेत आहेत हे जाहीर करायला हवे. तेे शिवछत्रपतींच्या समवेत आहेत, हिंदू समाजासमवेत आहेत कि जिथे अतिक्रमण झाले, जिथे यासिन भटकळसारखा अतिरेकी जिथे राहिला त्याचे समर्थन ते करत आहेत, हे पहावे लागेले. महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे अतिक्रमण काढले म्हणून त्रास का होत आहे ?
विशाळगडावर झालेली अतिक्रमणे ही १५ वर्षांपूर्वीची आहेत. त्या वेळी ही अतिक्रमणे काढण्यासाठी आंदालने झाली होती. त्या वेळी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही अतिक्रमणे काढण्यासाठी काय केले ? तीन महिन्यांपूर्वी कोल्हापूर शहरात दसरा चौकात जेव्हा ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या बसवर विशिष्ट समाजाच्या लोकांना दगडफेक केली आणि त्या वेळी जी लहान मुले रडत होती त्यांचे अश्रू या नेत्यांना का दिसले नाहीत ? त्यांचे अश्रू पुसण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते का गेले नाहीत ? त्यामुळे तुमचे आताचे साहाय्य हे मतांसाठी असलेली लाचारी आहे, असेच म्हणावे लागेल.
* राज्यातील सर्वच अतिक्रमणे हटवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार !
राज्यातील ज्या ज्या गडदुर्गांवर अशाप्रकारे अतिक्रमण करण्यात आले आहे ते सर्व अतिक्रमण हटवावे अशी मागणी आम्ही लवकरच मुख्यमंत्री, तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. अन्यथा असा उद्रेक वारंवार होईल ! याच समवेत पोलीस प्रशासनाने आता कारवाई करतांना आंदोलनासप्रसंगी जे शिवभक्त त्या वेळी तिथे उपस्थित नव्हते, अशा लोकांना कह्यात घेऊ नये, तसेच त्यांच्यावर कारवाई करू नये, असे आवाहन मी प्रशासनाला करतो.