Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवसाच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 जुलै रोजी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर पोहचणार आहेत. यावेळी शहिदांना श्रद्धांजली वाहणार असून त्यानंतर तिथे उपस्थित जवानांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान, रविवारी लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर ब्रिगेडियर (निवृत्त) बीडी मिश्रा यांनी सचिवालयात बैठक घेतली आणि द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकाला पंतप्रधानांच्या भेटीच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.
“लेफ्टनंट गव्हर्नर ब्रिगेडियर (डॉ) बीडी मिश्रा (निवृत्त) यांनी भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारगिल युद्ध स्मारक द्रास भेटीच्या व्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी लेफ्टनंट गव्हर्नरच्या सचिवालयात बैठक घेतली” या संबंधित कार्यालय लेफ्टनंट गव्हर्नर, लडाख यांनी X वर पोस्ट केले आहे.
यापूर्वी 2022 मध्ये पंतप्रधान मोदींनी कारगिलमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती आणि कारगिल युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण केला होता आणि 1999 मध्ये येथे प्राण गमावलेल्या लष्करी जवानांना श्रद्धांजली वाहिली होती.
दरवर्षी २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरी केला जातो. या दिवशी भारताने कारगिल युद्धात विजय मिळवला होता. जवळपास दोन महिने चाललेले कारगिल हे भारतीय सैन्याच्या धैर्याचे आणि शौर्याचे उदाहरण आहे.
1999 मध्ये कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. युद्धादरम्यान, कारगिल-द्रास सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलेला भारतीय भूभाग ताब्यात घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून ‘ऑपरेशन विजय’ सुरू करण्यात आले होते.