आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. . 12 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनात एकूण 19 बैठका होणार आहेत. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत. दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. त्यात देशाच्या आर्थिक विकासाचा लेखाजोखा असतो. आर्थिक सर्वेक्षण रोजगार, जीडीपी, महागाई आणि गेल्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तूट याबद्दल माहिती प्रदान करते. देशाने कोणत्या क्षेत्रात मिळवले आणि गमावले हे देखील दिसून येते. तर उद्या म्हणजेच २३ जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”२०१४ नंतर काही खासदार ५ वर्षांसाठी तर काही खासदार १० वर्षांसाठी निवडून आले. पण मी आज दुःखाने सांगतो आहे, असे अनेक खासदार आहेत, ज्यांना आपल्या मतदारसंघातील प्रश्न संसदेत मांडता आले नाहीत. आपले विचार संसदेत त्यांना समृद्ध करण्याची संधी मिळाली नाही. काही पक्षांच्या नकारात्मक राजकारणामुळे संसदेचा महत्वपूर्ण वेळ वाया गेला.”
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”कमीत कमी खासदार संसदेत निवडून आले आहेत यांना बोलण्याची संधी द्या अशी मी सर्व पक्षांना आग्रह करतो. त्यांना आपले विचार प्रकट करू द्या. व्यक्त होण्याची संधी त्यांना मिळुद्यात. सर्व खासदार पूर्ण तयारीनिशी चर्चेला समृद्ध करतील. देशाला एका विचारधारेची, देशाला नवीन उंचीवर घेऊन जाण्याऱ्या विचारधारेची आवश्यकता आहे. सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या लोकशाहीच्या मंदिराचा उपयोग करू यात.”
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. लोकसभेचे उपसभापतीपद विरोधकांना देण्याच्या मागणीवर काँग्रेस ठाम आहे. मणिपूर, एनईईटी पेपर लीक आणि यूपीमधील कावड यात्रेच्या मार्गांवर नेमप्लेट लावण्याच्या निर्णयावरही विरोधी पक्षनेते भाजप सरकारला तिखट प्रश्न विचारणार आहेत. प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचे मोदी सरकारचे म्हणणे आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष होऊ शकतो.