Budget Session 2024 : आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. 12 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनात एकूण 19 बैठका होणार आहेत. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आला. दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. त्यात देशाच्या आर्थिक विकासाचा लेखाजोखा असतो.
आर्थिक सर्वेक्षण रोजगार, जीडीपी, महागाई आणि गेल्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तूट याबद्दल माहिती प्रदान करते. तर उद्या म्हणजेच २३ जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प असणार आहे.
आर्थिक वर्ष 2025 मध्ये जीडीपीत 6.5 ते 7 टक्के वाढ होण्याची अपेक्षा
आर्थिक सर्वेक्षणात खासगी क्षेत्रावर जास्त फोकस पाहायला मिळाला आहे. या अहवालाच्या माध्यमातून 2023-24 या आर्थिक वर्षात देशाची वाटचाल कशी राहिली? याबाबत माहिती देण्यात आली. इतकेच नाही तर या आर्थिक पाहणी अहवालात आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशाचा जीडीपी हा 6.5 ते 7 टक्के राहणार असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.
महागाई दर कमी
आर्थिक सर्वेनुसार 2023-24 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची चांगली वाढ झाली आहे. सर्वेक्षणानुसार, काही श्रेणींमध्ये महागाई वाढली असली तरी, सर्व श्रेणी एकत्र पाहिल्यास महागाई नियंत्रणात असल्याचा दावा सरकारने केला आहे.
रोजगार निर्मिती करण्याची गरज
तसेच, आर्थिक पाहणी अहवालात रोजगारनिर्मितीवर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. सध्या वाढती मागणी आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करता देशात बिगरकृषी क्षेत्रात वर्षाला साधारण 78.51 लाख रोजगार निर्मिती करण्याची गरज आहे.