राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचे समजते आहे. ९ जुलै रोजी राज्यात ओबीसी-मराठा हा वाढत चाललेला वाद आणि मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र महाविकास आघाडीने या बैठकीला दांडी मारली. सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्ताधारी पक्षाने विरोधकांना या मुद्द्यावरून चांगलेच घेरले होते.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तासाचा राहावा, मराठा-ओबीसी वाद वाढत राहावा आणि त्यात आपली राजकीय पोळी भाजली जावी यासाठी विरोधकांनी बैठकीला हजेरी न लावल्याची टीका सत्ताधारी गटाकडून करण्यात आली. तर बैठकीला न जाण्यासंदर्भात बारामतीवरून फोन आल्याचे देखील टीका यावेळी करण्यात आली होती.
दरम्यान शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याचे समजते आहे. दरम्यान आरक्षणासाठी सरकारने आतापर्यंत काय काय केले याबाबतची माहिती शरद पवारांना मुख्यमंत्र्यानी दिल्याचे कळते आहे. त्यामुळे आता मराठा-ओबीसी आरक्षण यावर आपली भूमिका विरोधी पक्षाला स्पष्ट करावी लागणार आहे.