राज्याच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आणि काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई आणि उपनगर तसेच कोकणात अति ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आज वर्तविण्यात आला आहे. घाट माथ्यावर देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात पावसाने चांगली बॅटिंग केली आहे.
राज्यातील अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही नद्या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे. दरम्यान आज सकाळपासूनच मुंबई, उपनगर, पुणे आणि कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांमध्ये मुबंईत अति ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कामावर जाणाऱ्या नागरिकांची काहीशी तारांबळ उडताना पाहायला मिळत आहे. पावसामुळे लोकल वाहतुकीवर देखील परिणाम झालेला पाहायला मिळतोय.
काल दिवसभरात पुणे देखील मुसळधार पाऊस झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज रत्नागिरी, सातारा, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा हायअलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे या जिल्ह्यांमधील नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावे असे हवामान खात्याने सुचवले आहे. तर कोकणातही आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.