संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये देशातील विद्यार्थ्यांसाठी अर्थमंत्र्यानी मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प २०४७ च्या भारताच्या विकासाचा पाया असणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने म्हणजेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गरीब, तरुण, महिला यांच्या विकासासाठी प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळत आहे. या अर्थसंकल्पात अनेक नवीन घोषणा करण्यात आल्या. बिहार आणि आंध्र प्रदेश राज्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
आंध्र प्रदेश आणि बिहार राज्याला अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. दरम्यान या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला फारसे काही आलेले नाही. यावरून ठाकरे गटाने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नाशिकचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. वाजे म्हणाले, ”अर्थसंकल्प आज सादर झाला. त्यात पाहिल्यास महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही असे म्हणायला हरकत नाही. आंध्र प्रदेश व बिहारला मोठ्या प्रमाणात दिल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यांच्यामुळे सरकार आहे त्यांच्याकडे जास्त लक्ष दिल्यासारखं वाटत आहे. राज्याच्या या अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा होत्या. मात्र हाती काही आलेले नाही. याचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत दिसेल.” याप्रकारे एक इशाराच राजाभाऊ वाजे यांनी मोदी सरकारला दिलेला पाहायला मिळतोय.